नवी दिल्ली -फुटबॉल म्हटले की क्रिस्तियानो रोनाल्डोचे नाव हमखास डोळ्यासमोर येते. अनेक श्रीमंत खेळाडूंमध्येही त्याची गणना होते. मात्र एक काळ असा होता जेव्हा त्याला जेवणही मिळत नव्हते. बालपणी जेव्हा तो फुटबॉल खेळण्यासाठी घरापासून दूर जायचा तेव्हा अनेक वेळा तो उपाशी असायचा.
हेही वाचा -'पाकिस्तानात न येणाऱ्या लंकेच्या खेळाडूंवर पीएसलकडूनही बंदी घातली पाहिजे'
युवेंटसचा स्टार खेळाडू असलेल्या रोनाल्डोने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान आपला संघर्ष सांगितला होता. त्या काळात तो आणि त्याचे मित्र जवळ असणाऱ्या मॅक्डोनाल्डमध्ये उरलेले अन्न मागायला जात होते. तेव्हा तिथे काम करणाऱ्या तीन महिला रोनाल्डो आणि त्याच्या मित्रांना जेवण देत असत. या मुलाखतीच्या माध्यमातून रोनाल्डोने त्या महिलांचे आभार मानले होते. शिवाय, त्या महिलांना रोनाल्डोने आपल्या घरी जेवणाचे आमंत्रणही दिले होते.
रोनाल्डोने ही इच्छा बोलून दाखवल्यानंतर ब्रिटिश पत्रकार पियर्स मॉर्गन यांनी त्या महिलेला शोधून काढले आहे. मॉर्गन यांच्यानंतर पोर्तुगाल रेडिओमुळे पाउला लेन नावाची एक महिला समोर आली आहे. रोनाल्डोने सांगितल्याप्रमाणे, पाउला आधी मॅक्डोनाल्डमध्ये काम करत होती. ती म्हणाली, 'रोनाल्डोने सांगितलेले खरे होते. मी मॅक्डोनाल्डच्या मालकाला विचारून उरलेले अन्न रोनाल्डो आणि त्याच्या मित्रांना देत होती.'
'रोनाल्डो लाजाळू होता तो जास्त बोलत नसे', असेही पाउलाने म्हटले आहे.