नवी दिल्ली -लिव्हरपूलचा स्टार फुटबॉलपटू सादिओ माने एका नव्या ट्रोलिंगमुळे इंटरनेटवर व्हायरल होत आहे. लाखो-करोडो रूपयांमध्ये खेळणारा सादिओ त्याच्या आयफोनच्या तुटलेल्या स्क्रीनमुळे चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला. त्याच्या या मोबाईलवर एका चाहत्याने त्याला सल्ला दिला. चाहत्याच्या या सल्ल्यावर सादिओने आपली प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा -आगामी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा, अटापट्टूकडे नेतृत्व
सादिओच्या आयफोनची स्क्रीन तुटली होती. या प्रकरणी एका चाहत्याने त्याला 'अरे नवीन फोन नसशील घेत तर निदान स्क्रीन गार्ड तरी बदल', असा सल्ला दिला. या प्रकरणी सादिओने एका मुलाखतीमध्ये आपली प्रतिक्रिया दिली.
'हो मी मोबाईल ठीक करून घेईन. मी असे हजार मोबाईल विकत घेऊ शकतो. पण मला महागड्या वस्तूंची आवड नाही. मी गरीबी पाहिली आहे. मला शाळेत जाता आले नाही. मुलांना शिक्षण मिळावे म्हणून मी माझ्या देशात शाळा बांधून दिल्या. सोबत मी फुटबॉलची मैदानेही तयार केली. त्यावेळी माझ्याकडे खेळण्यासाठी शूजही नव्हते, चांगले कपडे नव्हते, पोटासाठी अन्न नव्हते. आज माझ्याकडे सर्व काही आहे. पण, मी ते दाखवले पाहिजे का? मला हे माझ्या लोकांना द्यायचे आहे', असे सादिओने आपली प्रतिक्रियेत म्हटले आहे.
२०१९ मध्ये आफ्रिकेच्या सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा मान सेनेगलच्या २७ वर्षीय सादिओला मिळाला आहे. यावर्षी त्याने ६१ सामन्यांत ३४ गोल नोंदवले आहेत.