बार्सिलोना -फुटबॉलविश्वातील सुपरस्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने त्याचा फुटबॉल क्लब बार्सिलोनाला रामराम ठोकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत मंगळवारी त्याने क्लबच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. दोन दशके मेस्सी बार्सिलोनामध्ये आहे. यंदाच्या हंगामात कोणतेही विजेतेपद जिंकू न शकल्यामुळे आणि बायर्न म्युनिकने चॅम्पियन्स लीगमध्ये पराभूत केल्यामुळे मेस्सी नाराज आहे.
मेस्सीने क्लब सोडण्याची इच्छा व्यक्त करण्यासंदर्भात कागदपत्रे पाठवली असून हे प्रकरण न्यायालयात पोहोचू शकेल, असे संकेत क्लबने दिले आहेत. ११ दिवसांपूर्वी चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत बायर्न म्युनिकने बार्सिलोनाला ८-२ असे हरवले होते. ३३ वर्षीय मेस्सीचा बार्सिलोनासोबत २०२१पर्यंत करार आहे. परंतु अलीकडच्या काळात क्लबच्या खराब कामगिरीमुळे तो लवकर बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करत आहे.