बार्सिलोना - लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाचे दिवंगत फुटबॉल दिग्गज दिएगो मॅराडानो यांना खास पद्धतीत श्रद्धांजली वाहिली आहे. रविवारी झालेल्या ओसासुनाविरुध्दच्या सामन्यात बार्सिलोनाने ४-० असा विजय मिळवला. या विजयात अंतिम गोल नोंदवल्यानंतर मेस्सीने मॅराडोना यांची जर्सी दाखवत श्रद्धांजली वाहिली.
मेस्सीची मॅराडोना यांना श्रद्धांजली हेही वाचा -जलद २२ हजार धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली पहिला फलंदाज
अंतिम गोलनंतर मेस्सीने अंगावरची बार्सिलोनाची जर्सी काढली. त्याखाली त्याने मॅराडोना यांच्या नेव्हल्स ओल्ड बॉयज संघाची लाल आणि काळी जर्सी परिधान केली होती. यानंतर मेस्सीने आकाशाकडे पाहताना मॅराडोना यांना आदरांजली वाहिली.
वयाच्या १३व्या वर्षी बार्सिलोना संघात येण्यापूर्वी मेस्सी नेव्हल्स संघाचा सदस्य होता. १९९४मध्ये मॅराडोना यांनी नेव्हल्ससाठी पाच सामने खेळले होते."अर्जेंटिना आणि फुटबॉलमधील सर्व लोकांसाठी अतिशय दु: खद दिवस आहे. त्यांनी आम्हाला सोडले, परंतु ते दूर जाऊ शकत नाहीत. ते अमर आहेत. मला त्या महान व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबासमवेत घालवलेले सर्व क्षण आठवले'', असे मेस्सीने मॅराडोना यांच्या निधनांनतर संदेशात लिहिले होते. बुधवारी ब्युनस आयर्स येथे हृदयविकाराच्या झटक्याने मॅराडोना यांचे निधन झाले. ते ६० वर्षांचे होते.