नवी दिल्ली - चॅम्पियन्स लीगमध्ये बार्सिलोनाला फेरेनसवारोसविरुद्ध ५-१ असा विजय मिळवून देण्यात दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची महत्त्वपूर्ण भूमिका होती. या सामन्यात केलेल्या गोलनंतर मेस्सी चॅम्पियन्स लीगमध्ये ३६ विविध संघांविरुद्ध गोल नोंदवणारा खेळाडू ठरला आहे. अर्जेंटिनाच्या या खेळाडूने चॅम्पियन्स लीगमध्ये ४१ संघांविरुद्ध सामने खेळले आहेत. परंतू रुबीन कजान, एटलेटिको मेड्रिड, बेनफिका, उडनीस आणि इंटर मिलान या संघांविरूद्ध त्याला एकही गोल करता आलेला नाही.
लिओनेल मेस्सी : चॅम्पियन्स लीगमध्ये ३६ संघांविरुद्ध गोल नोंदवणारा अवलिया - Lionel messi latest news
मेस्सी चॅम्पियन्स लीगमध्ये ३६ विविध संघांविरुद्ध गोल नोंदवणारा खेळाडू ठरला आहे. अर्जेंटिनाच्या या खेळाडूने चॅम्पियन्स लीगमध्ये ४१ संघांविरुद्ध सामने खेळले आहेत.
स्पॅनिश क्लब बार्सिलोनाच्या म्हणण्यानुसार, या गोलनंतर मेस्सी ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि राउल गोंजालेजपेक्षा तीन गोलने पुढे आहे. फेरेनसवारोसविरुद्धच्या सामन्यात मेस्सीने २७व्या मिनिटाला पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतर केले. सलग १६ मोसमात गोल नोंदवणारा मेस्सी चॅम्पियन्स लीगच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे.
मेस्सीने हंगेरीच्या या क्लबविरुद्ध गोल नोंदवल्यानंतर तो १६ देशांतील संघांविरूद्ध गोल करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने इंग्लंडमधील क्लबविरुद्ध सर्वाधिक गोल (२६) केले आहेत. त्याने अर्सेनलविरुद्ध सर्वाधिक ९ गोल केले आहेत. त्यांच्या पाठोपाठ एसी मिलान आणि सेल्टिक आहेत. मेस्सीने या दोघांविरूद्ध आठ गोल केले आहेत.