नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्यामुळे भारताच्या अंडर-१६ फुटबॉल संघाचा ताजिकिस्तान दौरा रद्द करण्यात आला आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने मंगळवारी ही माहिती दिली. ताजिकिस्तान फुटबॉल महासंघाने एआयएफएफला अधिकृत मेल पाठवून हा दौरा रद्द केला आहे.
हेही वाचा -तमीम इक्बालचा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच बांगलादेशी
ज्येष्ठ पुरुष संघालाही ३१ मार्चला ताजिकिस्तानशी मैत्रीपूर्ण सामना खेळायचा आहे. भारतीय संघ या दौऱ्यासाठी ५ मार्चला रवाना होणार होता. 'ताजिकिस्तान सरकारच्या सूचनेनुसार कोरोना व्हायरसची स्थिती पाहून भारतासह ३५ देशांचे नागरिक येथे भेट देऊ शकत नाहीत', असे ताजिकिस्तान फुटबॉल महासंघाने म्हटले आहे.
चीनच्या वुहान शहरातून सुरुवात झालेल्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा कहर अजून सुरूच आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराचे नाव आता COVID-१९ केले आहे. यामध्ये मागील वर्षी डिसेंबर महिन्यात या व्हायरसचा संसर्ग झाल्याचे सर्वांत प्रथम निदर्शनास आल्याचा उल्लेख आहे. या व्हायरसचे संक्रमण जवळजवळ जगभरात पसरले आहे.