दोहा -बलाढ्य कतारविरुद्ध झालेल्या विश्वचषक फुटबॉल पात्रता स्पर्धेच्या सामन्यात भारताने कतारला बरोबरीत रोखले. जासिम बिन हमाद स्टेडियमवर खेळलेल्या या सामन्यात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही.
हेही वाचा -विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतून तेजस्वनी शंकरची माघार
या सामन्यात भारताचा कर्णधार आजारी असल्यामुळे खेळू शकला नाही. त्यामुळे त्याच्या जागी संदेश झिंगान याने संघाचे नेतृत्व यशस्वीपणे केले. कतारच्या संघाने सुरुवातीपासूनच आक्रमण केले. पण भारतीय संघाने त्यांचे हे आक्रमण थोपवून धरले. पहिल्या सत्राच्या सातव्या मिनिटाला उदांता सिंह आणि मनवीर यांच्या जोडीने कतारचा बचाव भेदत संधी निर्माण केली होती. पण, पुजारीने जास्त वेळ आपल्याकडे बॉल ठेवल्याने भारताला ही संधी साधता आली नाही.
भारताचा बचावपटू गुरप्रीत सिंह संधू
१७ व्या मिनिटाला कतारला लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यानंतरही कतारला गोल करण्याची चांगली संधी मिळाली पण, भारताचा बचावपटू गुरप्रीत सिंह संधूने अप्रतिम बचाव केला. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात भारताने आक्रमण वाढवले. ५१ व्या मिनिटाला मिळालेल्या पासचा उदांताला फायदा उठवता आला नाही.
७० व्या मिनिटाला कतारला ११ वा पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र या वेळीसुद्धा कतारचा संघ गोल करण्यात अपयशी ठरला. ७६ व्या मिनिटाला बचावपटू गुरप्रीत सिंह संधूने परत एक जबरदस्त बचाव केला. शेवटी सामना ०-० असा बरोबरीत सुटला.