नवी दिल्ली - फुटबॉलपटूला सलग गोल करण्यासाठी सिक्स्थ सेन्स जागृत करणे आवश्यक असल्याचे भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बाइचुंग भुतियाने म्हटले आहे. एका टीव्ही माध्यमाशी बोलताना भुतियाने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "ही सिक्स्थ सेन्सची गोष्ट आहे. गोल कुठून करता येऊ शकतो हे पाहण्यासाठी सतत सर्तक राहावे लागते. जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंकडे ही क्षमता असते. आपल्याला परिस्थिती बघावी लागते. जर आपण आपल्या सिक्स्थ सेन्सला जागृत केले नाही तर आपण यशस्वी फुटबॉलपटू होऊ शकत नाही."
"गोल करणे ही भुतियासाठी जीवन-रणाची गोष्ट होती", असे संघाचा सध्याचा कर्णधार सुनील छेत्री म्हणाला होता. या गोष्टीचा संदर्भ देताना भुतिया म्हणाला, "आपणास दहा पैकी एक किंवा दोन स्थितीमध्ये गोल करण्याची संधी मिळते. परंतु आपल्याला ते सातत्याने करावे लागेल. फुटबॉलपटू म्हणून तुम्हाला जाणीव झाली पाहिजे कारण चेंडू जाळ्यामध्ये टाकण्यासाठी आपणास फक्त एक सेकंद आवश्यक आहे. तिथेच फुटबॉलपटूला तांत्रिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असणे आवश्यक आहे."