कोलकाता -भारतीय फुटबॉल संघाचे माजी खेळाडू अशोक चॅटर्जी यांचे शनिवारी वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. १९६५ आणि १९६६ मध्ये मेरडेका चषकात कांस्यपदक जिंकणार्या भारतीय संघाचा ते भाग होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा संदीप असा परिवार आहे.
हेही वाचा -आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या रवी दाहियाला सुवर्ण पदक
भारतीय संघासाठी ३० सामने खेळणार्या चॅटर्जी यांनी पीके बॅनर्जीची जागा घेऊन मर्डेका चषक -१९६५ च्या उत्तरार्धात जपानविरुद्ध पदार्पण केले होते. त्यांनी भारतासाठी १० गोल केले आहेत. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. 'अशोक चटर्जी यांचे निधन झाल्याचे ऐकून वाईट वाटले. ते अनेक फुटबॉलपटूंचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो', असे पटेल यांनी म्हटले आहे.
बँकॉकमध्ये खेळल्या गेलेल्या १९६६ च्या आशियाई स्पर्धेतही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. राष्ट्रीय संघाव्यतिरिक्त चॅटर्जीही मोहन बागानकडूनही खेळले आहेत. १९६१ ते १९६८ दरम्यान खेळताना त्यांनी क्लबसाठी ८५ गोल नोंदवले. २०१९ मध्ये त्यांना मोहन बागान लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.