नवी दिल्ली -भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार कार्लटन चॅपमन यांचे बंगळुरू येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ४९ वर्षांचे होते.
टाटा फुटबॉल अकादमी (टीएफए) मधून उदयास आलेले चॅपमन हे त्यांच्या काळात नामांकित मिडफिल्डर होते. १९९०मध्ये ते टीएफएमध्ये दाखल झाले. तीन वर्षांनंतर ते ईस्ट बंगालमध्ये गेले. नामांकित फुटबॉल क्लब अल जावाराविरुद्ध त्यांनी हॅटट्रिक केली होती.
१९९५पासून जेसीटी मिल्सबरोबर खेळत, त्यांनी १४ स्पर्धा जिंकल्या. १९९७-८८मध्ये त्यांनी एक हंगाम एफसी कोचीनबरोबर खेळला होता. २००१मध्ये त्याच्या नेतृत्वात संघाने राष्ट्रीय फुटबॉल लीगचे जेतेपद जिंकले. त्यानंतर त्यांनी व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली.
१९९५ ते २००१ या काळात ते भारतासाठी मिडफिल्डर म्हणून खेळले होते. निवृत्त झाल्यानंतर ते टीएफए संघाचे प्रशिक्षक बनले. डिसेंबर २०१७मध्ये, ते कोझीकोडच्या क्वार्ट्ज आंतरराष्ट्रीय फुटबॉल अकादमीचे तांत्रिक संचालक म्हणून नियुक्त झाले होते.