नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फटका क्रीडाविश्वाला देखील बसला आहे. अनेक स्पर्धा कोरोनामुळे रद्द किंवा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशात भारतात होणारा १७ वर्षांखालील फिफा महिला विश्वकरंडकही रद्द करण्यात आला आहे. पण असे असले तरी भारताला २०२२ मध्ये हा विश्वकरंडक आयोजित करण्याची संधी फिफाने दिली आहे.
१७ वर्षांखालील फिफा महिला विश्वकरंडक ही स्पर्धा नोव्हेंबर २०२० मध्येच होणार होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा फेब्रुवारी-मार्च २०२१ दरम्यान भारतात आयोजित करण्याचा निर्णय फिफाने घेतला होता. मात्र आता २०२१ मध्ये होणारी ही स्पर्धाही रद्द केली आहे. आता ही स्पर्धा २०२२ मध्ये हा भारतातच होईल.
या संदर्भात फिफाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. सर्व भागधारकांशी, सहभागी सदस्य संघटनांशी याबाबत सल्लामसलत आम्ही करत आहोत. तसेच खेळाडूंच्या सुरक्षेसाठी कोरोनाबाबत सुरक्षा आणि संभाव्य परिणामांवरही लक्ष ठेवून आहोत, असे त्यात म्हटलं आहे.