कोलकाता - विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात भारताने बांगलादेशला १-१ ने बरोबरीत रोखत घरच्या चाहत्यांसमोर पराभवाची नामुष्की टाळली. कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये रंगलेल्या सामन्यात फुटबॉलप्रेमींना थरार अनुभवायला मिळाला. भारताचा आक्रमणपटू आदिल खानने ८८ व्या मिनिटाला हेडरव्दारे गोल करत बांगलादेशला बरोबरीत रोखलं.
बांगलादेशविरुध्दच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी आक्रमणावर भर दिला. मात्र, गोल करण्यात ते वारंवार अपयशी ठरले. सामन्याच्या ४१ व्या मिनिटाला भारतीय गोलरक्षक गुरप्रीत सिंह संधूने चूक केली. तेव्हा याचा फायदा उचलत बांगलादेशचा खेळाडून साद उद्दीनने गोल केला आणि सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत ही आघाडी फोडण्यात भारताला अपयश आले.
भारताचे हल्ले बांगलादेशने परतवून लावले. सामन्यात बरोबरी साधण्यासाठी भारताने अथक प्रयत्न केले. ५१ व्या मिनिटाला बांगलादेशच्या झिबानने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुरप्रीतने तो हाणून पाडला. सुनिल छेत्रीचे दोन वेळा प्रयत्न अयशस्वी ठरले. भारताला आता पराभवाचे तोंड पहावे लागणार, असे चित्र जवळपास स्पष्ट झाले होते.
तेव्हा ८८ व्या मिनिटाला आदिल खानने गोलजाळ्याच्या उजव्या दिशेने हेडर लगावून भारतासाठी गोल केला. त्यानंतर भरपाई वेळेत कोणालाही दुसरा गोल करता आला नाही आणि अखेर सामना १-१ असा बरोबरीत सुटला.