नवी दिल्ली -स्पेनचा दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड विलाने बुधवारी फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अनुभवी क्लब एफसी बार्सिलोनाकडून खेळणारा विला या वर्षाच्या सुरुवातीपासूनच जपानच्या क्लब विस्सल कोबेबरोबर खेळत आहे.
हेही वाचा -Hong Kong Open : सायना नेहवालसह समीर वर्मा पहिल्या फेरीत बाद
विलाने ट्विटरद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. यंदाचा हंगाम संपल्यानंतर तो फुटबॉलला निरोप देईल. '१९ वर्षे व्यावसायिक फुटबॉल खेळल्यानंतर या हंगामाच्या शेवटी मी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला नेहमीच साथ देणाऱ्या माझ्या कुटुंबाचे आणि माझ्या कारकिर्दीचा आनंद घेऊ देणाऱ्या माझ्या सर्व प्रशिक्षकांचे मी आभार मानतो', असे विलाने ट्विटमध्ये म्हटले आहे.
या हंगामात जपानच्या फुटबॉल लीगमध्ये आतापर्यंत तीन सामने शिल्लक आहेत. २०१० च्या फिफा विश्वकरंडक विजेत्या स्पेनच्या संघात विलाचा समावेश होता.