मुंबई - युरो कप २०२० स्पर्धेत पोर्तुगाल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या एका कृतीमुळे कोका कोला कंपनीला तब्बल २९ हजार ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे रोनाल्डो पुन्हा चर्चेत आला आहे.
काय आहे प्रकरण -
पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोची पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेला संघाचे व्यवस्थापक फर्नांडो देखील उपस्थित होते. पत्रकार परिषदेत टेबलावर कोका कोलाची बाटली ठेवण्यात आली होती. हे पाहून रोनाल्डो भडकला. त्याने त्या बाटल्या टेबलावरून बाजूला केल्या. त्यानंतर त्याने बाजूला असलेली पाण्याची बाटली हातात घेत ओरडून 'शीत पेये नाही, पाणी प्यायची सवय करा' असे पत्रकारांना सांगितलं.
रोनाल्डोच्या त्या कृतीमुळे कोका कोलाचे कसे नुकसान झाले -
ख्रिस्तियानो रोनाल्डोचे चाहते जगभरात आहेत. जगभरातील कोट्यवधी लोक त्याला फॉलो करतात. अशात कोका कोलाचे सेवन करू नका, असा एक प्रकारचा मॅसेजच रोनाल्डोने त्या कृतीतून दिला. त्यामुळे कोका कोला कंपनीचे मोठे नुकसान झाले. कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. कोकचे शेअर्स १.६ टक्क्यांनी घसरले. त्याची किमत २४२ बिलियन डॉलरवरून २३८ बिलियन डॉलरवर आली आहे. भारतीय रुपयात सांगायचे झाल्यास त्यांना २९ हजार ३०० कोटींचे नुकसान झाले.
रोनाल्डोवर कारवाई होणार का?
युरो २०२० या स्पर्धेचा कोका कोला अधिकृत स्पॉन्सर आहे. त्यामुळे रोनाल्डोवर काही कारवाई होणार का? हे पाहवं लागेल. दरम्यान, रोनाल्डो फिटनेससाठी कोणत्याही शीतपेय अथवा एरेटेड ड्रिंकपासून दूर आहे. तसेच तो फिटनेससाठी अतिशय काटेकोरपणे डाएट सांभाळतो. दिवसात सहावेळा खाणे, पाच वेळा दीड दीड तासाची झोप, नाश्त्यासाठी मीट, चीज आणि दही, मध्ये भूक लागली तर टोस्ट असा त्याचा डाएट प्लान आहे. त्याच्या या डाएटमुळे तो वयाच्या ३६ व्या वर्षीदेखील मैदानात प्रतिस्पर्धी खेळाडूंवर भारी पडतो.
हेही वाचा -बार्सिलोना महिला संघाने रचला इतिहास, पहिल्यांदा जिंकली वूमन्स चॅम्पियन लीग
हेही वाचा -Euro 2020 : मैदानाच्या मध्यातून लगावलेला जादूई गोल पहिलात का?