नवी दिल्ली -पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने नेशन्स लीगमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देत इतिहास रचला. स्वीडन विरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात रोनाल्डोने दोन गोल करत संघाला २-० असा विजय मिळवून दिला. या दोन गोलमुळे रोनाल्डोने आपल्या कारकिर्दीतील शंभरावा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवला.
अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा फुटबॉलपटू ठरला. ३५ वर्षीय रोनाल्डोने सामन्यात ४५व्या मिनिटाला गोल नोंदवत ही विशेष कामगिरी केली. हाफटाइमच्या काही वेळ आधी रोनाल्डोने फ्री-किकच्या माध्यमातून सामन्यातला पहिला गोल केला.
रोनाल्डोच्या आधी इराणच्या अली देईने १०० आंतरराष्ट्रीय गोल नोंदवले असून त्याच्या नावावर सर्वाधिक १०९ आंतरराष्ट्रीय गोल आहेत. तिसर्या क्रमांकावर मलेशियाचा दहारी आहे, ज्याच्या खात्यात ८६ गोल आहेत. अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी या विक्रमात १५व्या क्रमांकावर आहे, आतापर्यंत त्याच्या खात्यात ७० आंतरराष्ट्रीय गोल आहेत.
या सामन्यादरम्यान रोनाल्डो पूर्ण फॉर्ममध्ये दिसला. पहिला गोल केल्यावर त्याने ७२व्या मिनिटाला दुसरा गोल केला. जुव्हेंटसच्या या खेळाडूच्या खात्यात आता १०१ आंतरराष्ट्रीय गोल जमा आहेत. रोनाल्डोने २००३मध्ये वयाच्या १८व्या वर्षी पोर्तुगालकडून पदार्पण केले आणि २००४मध्ये ग्रीसविरुद्ध युरो स्पर्धेत पहिला गोल केला होता.