मुंबई - कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने ब्राझीलचा पराभव करत विजेतेपद पटकावले. यासोबतच अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्याचे स्वप्नही साकार झाले. विजयानंतर मेस्सी आणि त्याचे सहकारी खेळाडू सेलिब्रेशन करत होते. त्यावेळी तिथे ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमार पोहोचला. तेव्हा मेस्सीने नेमारची गळाभेट घेतली. या भावनिक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मार्काना स्टेडियममध्ये अर्जेटिना आणि ब्राझील या दोन तुल्यबळ संघांमध्ये कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. अर्जेंटिनाने या सामन्यात १-० ने ब्राझीलला नमवत विजेतेपद पटकावले. अर्जेंटिनाकडून एंजल डी. मारिया याने एकमेव गोल केला. तब्बल २८ वर्षांनंतर कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळाल्याने अर्जेटिनाच्या खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यामुळे खेळाडू मोठ्या उत्साहात सेलिब्रेशन करत होते.