बीजिंग -चीनचा आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू वू लेईला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. स्पेनमधील बार्सिलोना येथे वू लेईची कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीत तो 'पॉझिटिव्ह' आढळला. सध्या वू लेई आपल्या घरी एकांतवासात असल्याचे वृत्त सिन्हुआने दिले आहे.
हेही वाचा -कोरोनामुळे श्रीलंकेतील स्थानिक क्रिकेट सामने स्थगित
वू लेई स्पॅनिश लीगमध्ये इस्पनियोलकडून खेळतो. युरोपमधील पाच मोठ्या फुटबॉल लीगमध्ये खेळणारा तो चीनमधील एकमेव खेळाडू आहे. कोरोनाची लागण झालेला तो चीनमधील पहिला व्यावसायिक फुटबॉलपटू ठरला आहे.
चीनमधून जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा फटका क्रीडा विश्वाला बसला आहे. जगभरातील बहुतांश स्पर्धा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. पण, आता अनेक फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे युरोपमधील सीरी ए, इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा, बुंदेसलिगा आदी फुटबॉल लीग रद्द करण्यात आल्या आहेत.