मुंबई -ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यातील विश्व कप पात्रता फेरीचा सामना अचानक स्थगित करण्यात आला आहे. या सामन्यात कोरोना प्रोटोकॉलचे पालन न करणाऱ्या तीन खेळाडूंना बाहेर काढण्यासाठी स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना थेट मैदानात यावं लागलं. दरम्यान, उभय संघातील सामन्यात अर्जेंटिनाकडून लिओनेल मेस्सी तर ब्राझीलकडून नेमार खेळत होता. पण सातव्या मिनिटाला सामना अचानक थांबवण्यात आला. तोपर्यंत दोन्ही संघाला गोल करण्यात यश आलेलं नव्हतं.
खेळाडू, प्रशिक्षक, फुटबॉल अधिकारी आणि स्थानिक अधिकारी यांच्यात खूप वाद झाला. ब्राझीलच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे की, अर्जेंटिनाचे तीन खेळाडू इंग्लंडमध्ये राहत आहेत. त्या खेळाडूंना क्वारंटाईन राहायला सांगितलं होते. परंतु ते सामना खेळत आहेत. फीफा पात्रता फेरीविषयात पुढे काय करावं हा निर्णय घेईल.