लिस्बन -प्रथमच यूएफा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात पोहोचलेल्या पॅरिस सेंट जर्मेनचे (पीएसजी) विजेतेपदाचे स्वप्न धूळीस मिळाले. रविवारी खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात बायर्न म्युनिकने पीएसजीचा १-० ने पराभूत तर सहाव्यांदा चॅम्पियन्स लीग आपल्या नावावर केली.
सामन्याच्या पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरीत खेळ थांबला. दोन्ही संघांपैकी एकालाही अतिरिक्त वेळेत गोल करणे शक्य झाले नाही. पण अखेर उत्तरार्धात किंग्जले कोमानने ५९व्या मिनिटाला गोल करत बायर्न म्युनिकला आघाडी मिळवून दिली.
कोरोनामुळे ही लीग लांबली होती. या सामन्यात पीएसजीचा स्टार खेळाडू नेमारची जादू दिसली नाही. रॉबर्ट लेवांडोव्हस्की, मॅन्युअल न्यूअर, नेमार आणि किलियन एम्पाबे यांसारखे मोठे खेळाडू अंतिम फेरीत खेळत होते, पण त्यांना गोल करण्यात अपयश आले. बायर्न म्युनिकने याआधी १९७४, १९७५, १९७६ असे सलग तीन आणि २००१, २०१३ मध्ये त्यांना चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळाले होते.
या विजेतेपदासोबतच स्पर्धेत एकही सामना न गमावणारा बायर्न म्युनिक हा युरोपियन देशांमधील पहिला संघ ठरला. सलग ११ सामने जिंकत त्यांनी हे विजेतेपद मिळवले. विजेतेपदाच्या षटकारासह त्यांनी लिव्हरपूलशी बरोबरी केली. सर्वाधिक वेळा स्पर्धा जिंकणाऱ्यांच्या यादीत रियल माद्रिद (१३) अव्वल तर एसी मिलान (७) दुसऱ्या क्रमांकावर आहेत.