Copa America 2021 Final : ब्राझीलला १-० ने हरवत अर्जेंटिनाचा विजय; मेस्सीने पहिल्यांदाच जिंकली मेजर टूर्नामेंट - कोपा अमेरिका २०२१
07:52 July 11
ब्राझीलला १-० ने हरवत अर्जेंटिनाचा विजय; मेस्सीने पहिल्यांदाच जिंकली मेजर टूर्नामेंट
हैदराबाद :कोपा अमेरिका २०२१ या स्पर्धेचा अंतिम सामना आज पार पडला. अर्जेंटिना विरुद्ध ब्राझील अशा या सामन्यामध्ये. अर्जेंटिनाने १-० ने विजय मिळवला. अँजेल डी मारियाने २२व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने लीड मिळवलं होतं. ब्राझीलला मात्र शेवटपर्यंत आपलं खातं उघडता आलं नाही. यामुळे लियोनेल मेस्सीच्या कॅप्टनशिपखाली पहिल्यांदाच अर्जेंटिनाने मोठी टूर्नामेंट जिंकली आहे.
अंतिम सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये २२व्या मिनिटालाच अर्जेंटिनाचा गोल झाला होता. त्यानंतर ब्राझीलनेही आक्रमक खेळ सुरू केला होता. सामन्यात ६० टक्के वेळ बॉल ब्राझीलकडे राहिला. तसेच, १३ वेळा गोलपोस्टवर थेट आक्रमणही करण्यात आलं. मात्र, तरीही ब्राझीलला एकही गोल करता आला नाही.
अर्जेंटिनाने तब्बल २८ वर्षांनंतर कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली आहे. यापूर्वी १९९३मध्ये अर्जेंटिनाने हा कप जिंकला होता. त्यानंतर २०१५ आणि २०१६ मध्येही अर्जेंटिना अंतिम सामन्यापर्यंत पोहोचून पराभूत झाली होती. मात्र, यावर्षी अँजेलने केलेल्या गोलमुळे अर्जेंटिनाचा हा दुष्काळ संपला. २०१६मध्ये अंतिम सामन्यात हरल्यानंतर मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यावेळी केवळ २९ वर्षांचा असलेल्या मेस्सीला राष्ट्रपतींनी निवृत्ती मागे घेण्याची विनंती केली होती.