कोलकाता - अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) 2020-21 हंगामातील तारखा जाहीर केल्या आहेत. हा हंगाम 1 ऑगस्ट ते 31 मेपर्यंत असेल. 1 ऑगस्ट ते 20 ऑक्टोबरपर्यंत ट्रान्सफर विंडो उघडणार आहे.
''फिफाने 2020-21साठी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या (एआयएफएफ) हंगामातील तारखा आणि नोंदणी कालावधी (ट्रान्सफर विंडोमधील) दुरुस्तीस मान्यता दिली आहे", असे एआयएफएफने परिपत्रकात म्हटले.
साधारणपणे, भारतीय ट्रान्सफर विंडो 9 जून रोजी उघडणार असून 31 ऑगस्टला बंद होईल. कोरोनामुळे आय-लीगला उर्वरित सामने खेळवता न आल्याने भारतीय फुटबॉल हंगाम संपुष्टात आला. मोहन बागानला विजेता घोषित करण्यात आले. भारतातील शेवटचा फुटबॉल सामना आयएसएलमध्ये एटीके आणि चेन्नईन एफसी यांच्यात पार पडला. हा सामना गोव्यातील फोर्टोर्डा स्टेडियमवर प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात आला.
फिफा वर्ल्ड कप 2022च्या पात्रता गटात भारतीय पुरुष फुटबॉल संघ कतारविरुद्ध सामना खेळणार आहे. हा सामना 26 मार्चला भुवनेश्वर येथे होणार होता. मात्र कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आला. आता हा सामना 8 ऑक्टोबरला होईल.
कतारव्यतिरिक्त भारतीय संघ 12 नोव्हेंबरला यजमान बांगलादेश आणि त्यानंतर 17 नोव्हेंबरला अफगाणिस्तानशी सामना खेळेल. एशियन फुटबॉल महासंघाने (एएफसी) फिफाशी चर्चा केल्यानंतर फिफा वर्ल्ड कप 2022 पात्रता स्पर्धेच्या तारखा निश्चित केल्या आहेत.