रोम - स्वीडनचा दिग्गज फुटबॉल खेळाडू झ्लाटन इब्राहिमोविच इटलीच्या क्लब एसी मिलानमध्ये विनामूल्य बदली म्हणजेच फ्री ट्रांस्फरवर दाखल झाला आहे. २०१० ते २०१२ पर्यंत एसी मिलानमधून खेळणारा इब्राहिमोविचने आगामी हंगामासाठी क्लबशी करार केला आहे.
हेही वाचा -VIDEO : क्रिकेटच्या सामन्यात चेंडू झाला गायब!.. अन् मैदानात सुरू झाली शोधाशोध
एसी मिलानने शुक्रवारी आपल्या अधिकृत वेबसाइटवर याची पुष्टी केली. स्वीडिश आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि माजी लॉस एंजेलिस गॅलेक्सी स्टार इब्राहिमोविच यापूर्वी दोन वर्ष एसी मिलानकडून खेळला होता. क्लबकडून त्याने ८५ सामने तर, एकूण मिळून ५३५ सामने खेळले आहेत. इब्राहिमोविच संघात असताना क्लबने दोनवेळा सेरी-ए टायटचा किताब पटकावला.
'मी ज्या क्लबचा खूप आदर करतो अशा क्लबमध्ये परत जात आहे. मला मिलानचा संघ आवडतो. या हंगामात क्लबसाठी गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी माझ्या सहकाऱ्यांसह काम करेन. आम्ही एकत्रितपणे आमचे हेतू साधण्याचा प्रयत्न करू', असे इब्राहिमोविचने करार झाल्यानंतर म्हटले.
१९९९ मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारा इब्राहिमोविच मालमा, अजॅक्स, जुव्हेंटस, इंटर मिलान, बार्सिलोना, एसी मिलान, पीएसजी आणि मँचेस्टर युनायटेड यासारख्या क्लबकडून खेळला आहे. त्यानंतर २०१८ मध्ये तो मेजर लीग सॉकर खेळण्यासाठी अमेरिकेत गेला होता.