कोलकाता - यंदाच्या डुरंड कप फुटबॉल स्पर्धेत 16 संघाचा सहभाग असणार आहे. यात इंडियन सुपर लीग (आयएसएल) च्या पाच फ्रेंचायझी आणि आय लीगमधील तीन संघाचा समावेश आहे. दरम्यान, ही स्पर्धा पाच सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर या काळात होणार आहे.
डुरंड कप फुटबॉल स्पर्धेचा यंदाचा हा 130वा हंगाम आहे. याआधी ही स्पर्धा दिल्लीमध्ये खेळली जात होती. पण 2019 पासून याचे आयोजन कोलकातामध्ये करण्यात येत आहे. पारंपरिक पद्धतीने भारतीय सेना आणि सशस्त्र दलाकडून याचे आयोजन करण्यात येते. पश्चिम बंगाल सरकार आणि भारतीय सेना या स्पर्धेचे संयुक्तपणे आयोजन करतं.
डुरंड कप फुटबॉल स्पर्धेत आयएसएल फ्रेंचायझी एफसी गोवा, बंगळुरू एफसीशिवाय भारताचे अव्वल डिव्हिजन क्लब केरला ब्लास्टर्स, जमशेदपूर एफसी आणि हैदराबाद एफसी देखील सहभागी होणार आहे.
एफसी बंगळुरू, यूनायटेड आणि दिल्ली एफसी भारतीय फुटबॉलच्या सेकंड डिव्हिजनचे प्रतिनिधित्व करतील. तर भारतीय सेनेचे दोन संघ (लाल आणि हिरवा), भारतीय हवाई सेना, भारतीय नौसेना, सीआरपीएएफ आणि आसाम रायफल्सचे संघ राउंड ऑफ 16 मध्ये असतील.