लंडन -क्रीडाविश्वात कधी काय होईल हे सांगता येणं कठीण आहे. आपल्या आवडत्या खेळाडूसाठी आणि संघासाठी चाहते वाट्टेल ते करायला तयार असतात. दरम्यान, फुटबॉलविश्वातील मोठा क्लब असलेल्या मँचेस्टर युनायटेडच्या एका १० वर्षाच्या चाहत्यानं प्रतिस्पर्धी संघाला हरवण्यासाठी नवीन शक्कल लढवली आहे. या चाहत्याने प्रतिस्पर्धी संघाच्या प्रशिक्षकाला एक पत्र लिहून त्यामध्ये त्याने काही सामने हरण्याची विनंती केली आहे.
हेही वाचा -विंडीजचा 'हा' अष्टपैलू क्रिकेटपटू आता पाकिस्तानचा नागरिक?
डाराघ कुर्ले असे या १० वर्षाच्या मुलाचे नाव असून तो मँचेस्टर युनायटेड संघाचा चाहता आहे. त्याने लिव्हरपूलच्या प्रशिक्षकांना म्हणजे जर्गन क्लोप यांना एक पत्र लिहिले. 'तुम्ही आणखी नऊ सामने जिंकल्यास इंग्लिश फुटबॉलमधील सर्वाधिक सामने जिंकणारा संघ ठरू शकता. आणि मी युनायटेडचा चाहता असल्याने ही माझ्यासाठी खेदजनक गोष्ट आहे. त्यामुळे लिव्हरपूल जेव्हा पुढील सामने खेळेल तेव्हा प्रतिस्पर्धी संघाला गोल करू द्या', असे कुर्लेने आपल्या पत्रात म्हटले आहे.
या पत्राला जर्गन क्लोप यांनी उत्तर दिले आहे. 'जसे आपण लिव्हरपूलला हरवू इच्छित आहात त्याप्रमाणे, माझे काम संघाला जिंकण्यासाठी मदत करण्यासाठी सर्वकाही करणे आहे, जेणेकरून लिव्हरपूल अधिक सामने जिंकू शकेल. कारण या क्लबला जगभरातील कोट्यवधी चाहते आहेत. या चाहत्यांसाठी संघाला जिंकणे महत्वाचे आहे', असे क्लोप यांनी उत्तरात म्हटले आहे.
लिव्हरपूल सध्या ७६ गुणांसह ईपीएलमध्ये प्रथम स्थानावर आहे. मॅनचेस्टर युनायटेड ३८ गुणांसह सातव्या स्थानावर आहे.