लीड्स -भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या आक्रमकतेमुळे ओळखला जातो. भारतीय गोलंदाजाने विकेट घेतल्यानंतर विराटचा अविर्भाव पाहण्यालायक असतो. पण त्याची ही सवय भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांना रुचलेली नाही. त्यांनी या विषयावरून विराट कोहलीवर अप्रत्यक्ष निशाना साधला आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने कॉलम लिहले आहे. तो त्याच्या कॉलममध्ये म्हणतो की, विराट कोहली योग्य वेळी भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी परफेक्ट खेळाडू आहे. भारतीय संघातील खेळाडू यात खासकरून गोलंदाजांना आक्रमक कर्णधार पाहिजे आहे. हा असा संघ आहे ज्याला भयभीत करता येत नाही. पण त्याआधीच्या भारतीय संघाना भयभीत केले जाऊ शकत होते.
नासिर हुसेनचे हे मत सुनिल गावसकर यांना पटलेले नाही. त्यांनी भारत-इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी समालोचन करताना यावर प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी म्हटलं की, केवळ तुम्हाला चेहऱ्यावर आक्रमकता दाखवण्याची गरज नाही.
जेव्हा तुम्ही म्हणता याआधीच्या संघाला भयभीत करता येत होते. पण असे मला वाटत नाही. माझ्या पिढीबाबत हे म्हटलं तर मी निराश होईन. रेकॉर्ड पाहिलं तर 1971 मध्ये आम्ही जिंकलो होतो. तो माझा पहिला इंग्लंड दौरा होता. 1974 मध्ये समस्या होत्या. यामुळे आम्ही 3-0 ने पराभूत झालो. 1979 मध्ये पुन्हा पराभूत झालो. ओव्हलमध्ये 438 धावांचा पाठलाग करताना मालिका 1-1 अशी होऊ शकली असती. 1982 मध्ये आम्हाला पुन्हा 1-0 ने पराभव स्वीकारावा लागला. 1986 मध्ये आम्ही 2-0 ने जिंकलो. ही मालिका आम्ही 3-0 ने जिंकू शकलो असतो, अशी आकडेवारीच गावसकर यांनी हुसेनला सांगितली.