महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Yashasvi Jaiswal : पाणीपुरी विकणाऱ्या पोराने कसोटी पदार्पणातच ठोकले शतक! - विदेशात पदार्पणात शतक

मूळचा उत्तर प्रदेशचा यशस्वी जैस्वाल भारतीय संघात खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला गेला. तेथे उदरनिर्वाहासाठी त्याने चक्क पाणीपुरी विकली. आता तो सुरेश रैना, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली यांच्यासारख्या दिग्गज फलंदाजांच्या लिस्टमध्ये सामील झाला आहे.

Yashasvi Jaiswal
यशस्वी जैस्वाल

By

Published : Jul 14, 2023, 9:17 PM IST

हैदराबाद : टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालचा मुंबईत 'पाणीपुरी' विकण्यापासून ते कसोटी पदार्पणात शतक झळकावण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर होता. कसोटी पदार्पणात शतक ठोकणारा तो 17 वा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने डॉमिनिका येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दमदार शतक झळकावले आहे.

विदेशात पदार्पणात शतक झळकवणारा 7 वा भारतीय : जैस्वाल सुरेश रैना, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, प्रवीण आमरे, सुरिंदर अमरनाथ आणि अब्बास अली बेग यांच्यासारख्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे, ज्यांनी विदेशात पदार्पणात कसोटी शतक झळकावले. असे करणारा तो केवळ सातवा भारतीय आणि 13 वर्षांतील पहिला फलंदाज ठरला आहे. 2010 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 120 धावा करणारा सुरेश रैना हा भारताबाहेर पदार्पणात कसोटी शतक झळकावणारा शेवटचा भारतीय फलंदाज होता.

उदरनिर्वाहासाठी पाणीपुरी विकली : डावखुरा फलंदाज यशस्वीचे लहाणपणापासूनच भारतासाठी खेळण्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्याच्या कुटुंबाने उत्तर प्रदेशातून मुंबईमध्ये स्थलांतर केले. मात्र त्यांच्यासाठी महानगरातील जीवन सोपे नव्हते. त्यांनी दक्षिण मुंबईतील एका तंबूत राहून दिवस काढले, तर उदरनिर्वाहासाठी पाणीपुरी देखील विकली. मुंबई उपनगरातील सांताक्रूझच्या एअर इंडिया मैदानावर क्रिकेट अकादमी चालवणाऱ्या ज्वाला सिंग यांनी यशस्वीमध्ये विलक्षण प्रतिभा पाहिली. त्यांनी त्याला प्रशिक्षण देण्याचे ठरवले. पुढे जे काही घडले ते सर्व ऐतिहासिक असेच आहे!

अंडर 19 विश्वचषकात सर्वाधिक धावा ठोकल्या : ज्वाला आणि जयस्वाल यांनी वर्षानुवर्षे मेहनत घेतली ज्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. जयस्वालने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंडर 19 विश्वचषकात सर्वाधिक धावा ठोकल्या. तेव्हापासूनच तो निवड समितीच्या रडारवर होता. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून चांगले प्रदर्शन केल्यानंतर निवडकर्त्यांनी त्याला टीम इंडियामध्ये संधी देण्याचा निर्णय घेतला. त्याने त्या संधीचे अक्षरश: सोने केले.

शतक पालकांना समर्पित केले : कसोटी पदार्पणात शतक झळकवल्यानंतर यशस्वीने हे शतक आपल्या पालकांना समर्पित केले आहे. 'माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि ज्यांनी मला पाठिंबा दिला त्यांच्यासाठी हा क्षण अत्यंत भावनिक होता', असे त्याने शतक झळकवल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. यशस्वीच्या मते ही फक्त सुरुवात आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने मुंबईची शानदार फलंदाज देण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. मुंबईने आत्तापर्यंत अजित वाडेकर, सुनील गावस्कर, सुधीर नाईक, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, संदीप पाटील, विनोद कांबळी, रोहित शर्मा यांसारखे उत्तम फलंदाज दिले आहेत.

हेही वाचा :

  1. Wimbledon Logo Maharashtra : महाराष्ट्राच्या कलाकारांनी 100,000 चौरस फूट मैदानावर साकारला विम्बल्डनचा 'सर्वात मोठा' लोगो!
  2. Lakshya Sen : 21 वर्षीय लक्ष्य सेनने पटकावले कॅनडा ओपन स्पर्धेचे विजेतेपद
  3. R Ashwin Record : अश्विनचा कसोटी क्रिकेटमध्ये अनोखा रेकॉर्ड!, कोणालाही असे करणे अशक्यच

ABOUT THE AUTHOR

...view details