हॅमिल्टन:आयसीसी महिला विश्वचषक 2022 ( Women World Cup 2022 ) या स्पर्धेतील विसावा सामना पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज ( Pakistan v West Indies ) संघात झाला. हा सामना पाकिस्ताने वेस्ट इंडिजवर 8 विकेट्स राखून जिंकला. तसेच स्पर्धेतील हा पाकिस्तानचा पहिला विजय आहे. पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने निर्धारित 20 षटकांत 7 विकेट गमावून 89 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 18.5 षटकांत 2 गडी गमावून 90 धावा करत विजय मिळवला.
या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक ( Pak won the toss ) जिंकून वेस्ट इंडिज संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. त्यानुसार प्रथम फलंदाजी करायला आलेल्या वेस्ट इंडिज संघाची सलामीवीर हेली मॅथ्यूज अवघी 1 धाव करून फातिमा सनाची बळी ठरली. डायंड्रा डॉटिन आणि स्टेफनी टेलरने दुसऱ्या विकेटसाठी 15 धावांची भागीदारी केली. डॉटिन 27 आणि टेलर 18 धावांवर बाद झाली.
पाकिस्तानच्या तगड्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजच्या एकापाठोपाठ एक विकेट पडत राहिल्या. खालच्या क्रमवारीत, एफी फ्लेचरने नाबाद 12 आणि आलिया अॅलनने नाबाद 9 धावा केल्या. अशा प्रकारे पूर्ण 20 षटके खेळताना वेस्ट इंडिजने 89/7 ( West Indies 89/7 ) धावा केल्या. पाकिस्तानसाठी गोलंदाजी करताना निदा दारने सर्वाधिक 4 बळी घेतले आणि आपल्या देशासाठी विश्वचषकातील सर्वोत्तम गोलंदाजीची नोंद केली. अनम अमीनला काही यश मिळाले नाही. पण तिने 4 षटकात फक्त 6 धावा देऊन कॅरेबियन फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी दिली नाही.