मुंबई - न्यूझीलंड संघाने क्रिकेट इतिहासात खूप चढ उतार पहिले आहेत. सलग दोन वेळा आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेची (२०१५ आणि २०१९) अंतिम फेरी गाठल्यानंतरही त्यांना विजेतेपदाने हुलकावणी दिली. पण त्यांनी हा दुष्काळ बुधवारी संपला. न्यूझीलंडने भारतीय संघाचा पराभव करत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेतेपद पटकावल्यानंतर न्यूझीलंडचे खेळाडू भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू रॉस टेलर विजयानंतर म्हणाला, सामन्यादरम्यान भरपूर पाऊस झाला. पण आमच्या संघाने ज्या पद्धतीने संघर्ष करत सामन्यात वापसी केली. ते मी कधीही विसरू शकणार नाही. प्रचंड दबाव होता, यात दुमत नाही. पण आम्ही परिस्थिती नुसार खेळ केला.
न्यूझीलंडसाठी १०८ कसोटी सामने खेळणाऱ्या ३७ वर्षीय रॉस टेलरने अंतिम सामन्यात विजयी फटका लगावला. त्याने या सामन्यात नाबाद ४७ धावांची खेळी केली. संघ अडचणीत असताना त्याने केलेली ही खेळी न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासात आजरामर झाली. सामना संपल्यानंतर रॉस टेलर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याने, मी हा विजय आयुष्यभर लक्षात ठेवेन, असे सांगितलं. टेलरसोबत न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टिम साउथी देखील भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.