मुंबई- भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना उद्या शुक्रवारपासून इंग्लंडच्या साउथम्पटनमध्ये रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंड हे संघ आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल ठरले, यामुळे ते अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. या सामन्याआधी आम्ही तुम्हाला उभय संघातील हेड टू हेड आकडेवारीविषयी सांगणार आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत ५९ कसोटी सामने झाली आहेत. यात भारताने २१ सामने जिंकली आहेत. तर न्यूझीलंडचा संघ १२ सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. राहिलेले २६ सामने अनिर्णीत राहिले आहेत. ५९ सामन्यापैकी २५ सामने हे न्यूझीलंडमध्ये खेळवण्यात आले आहेत. यातील ५ सामने भारताने तर १० सामने न्यूझीलंडने जिंकले. राहिलेले १० सामने अनिर्णीत राहिले. उभय संघात अखेरची मालिका २०२० साली न्यूझीलंडमध्ये झाली. यात न्यूझीलंडने भारताचा २-० ने पराभव केला होता.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना १९ ते २४ डिसेंबर (१९५५) या दरम्यान, खेळवण्यात आला. हैदराबादमध्ये खेळला गेलेला हा सामना अनिर्णीत राहिला होता. उभय संघातील अखेरचा सामना २०२० मध्ये ख्राइस्टचर्च येथे पार पडला असून यात न्यूझीलंडने ७ गडी राखून विजय मिळवला.