लंडन :वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला आहे. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 444 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात टीम इंडिया 234 धावाचं करू शकली. या पराभवासह भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याचे स्वप्न धुळीला मिळाले आहे. भारतीय संघ सलग दुसऱ्या फायनलमध्ये पराभूत झाला आहे. 2021 मध्ये न्युझीलंडने भारताचा पराभव करत पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली होती.
भारताची निराशाजनक फलंदाजी : दुसऱ्या डावात भारताचा एकही फलंदाज 50 धावांचा आकडा गाठू शकला नाही. भारताकडून अजिंक्य रहाणेने एकाकी झुंज दिली. भारताकडून रोहित शर्मा (43), शुभमन गिल (18), चेतेश्वर पुजारा (27), विराट कोहली (49), अजिंक्य रहाणे (46), रविंद्र जडेजा (0), के. एस. भरत (23) धावा करू शकले. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू नॅथन लॉयनने उत्कृष्ट गोलंदाजी करत 4 बळी घेतले. तर स्कॉट बोलॅंडने 3 आणि मिशेल स्टार्कने 2 विकेट घेतल्या. पहिल्या डावात शानदार 163 धावा करणाऱ्या ट्रॅव्हिस हेडला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
पहिल्या डावात भारतीय संघ ढेपाळला : ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 ही मोठी धावसंख्या उभारून त्यांचा विजय जवळपास निश्चित केला होता. प्रत्युतरात भारतीय संघ 296 धावांच करू शकला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 173 धावांची मोठी आघाडी मिळाली होती. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा (15), विराट कोहली (14), शुभमन गिल (13), चेतेश्वर पुजारा (14) स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. अजिंक्य रहाणेने 89, रवींद्र जडेजाने 48 आणि शार्दुल ठाकूरने 51 धावा करत संघाची धावसंख्या 296 पर्यंत नेली.
भारताचा सलग दुसऱ्या फायनलमध्ये पराभव : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023 चा हंगाम दोन वर्षे चालला. यामध्ये चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत अव्वल, तर भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे दोन्ही संघांना अंतिम सामना खेळण्याची संधी मिळाली. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा WTC च्या अंतिम फेरीत पोहोचला होता. गेल्या वेळी टीम इंडियाला साउथहॅम्पटनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते.
हेही वाचा :
- Ravindra Jadeja Record : रवींद्र जडेजाच्या नावे आणखी एक विक्रम, तिन्ही फॉरमॅटमध्ये बनला सर्वोत्कृष्ट खेळाडू