मुंबई - भारताचा आठ गडी राखून पराभव करत न्यूझीलंडने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या खेळाडूंनी सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. न्यूझीलंडचे खेळाडू तिन्ही आघाडीवर सरस ठरले. या विजयानंतर न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर भावूक झाला. त्याने सामना संपल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.
रॉस टेलर म्हणाला, या विजयाने २०१९ साली इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवाचे नुकसान भरून निघालं. दरम्यान, २०१९ साली न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. हा सामना सुपर ओव्हरमध्ये देखील टाय झाला. तेव्हा सुपर ओव्हरच्या चौकाराच्या नियमानुसार इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. तोंडाशी आलेला विजयाची चव न्यूझीलंड संघाला नियमामुळे चाखता आली नाही. ते शल्य टेलरच्या मनात होते.