साउथम्पटन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साउथम्पटनमध्ये खेळला जात असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा आज पाचवा दिवस आहे. पावसामुळे पहिला आणि चौथा दिवस वाया गेला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसी अंधूक प्रकाशांमुळे कमी षटके खेळवण्यात आली. आज पाचव्या दिवशी देखील सामन्याला उशिरा सुरूवात झाली. जसप्रीत बुमराहने आज पहिले षटके फेकले. पण, हे षटक पूर्ण झाल्यानंतर तो ड्रेसिंग रुमकडे धावत सुटला. यामुळे सुरूवातीला नेमकं काय झालं हे काही कळालं नाही. पण बुमराहने केलेली चूक नंतर समोर आली.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह चुकीची जर्सी घालून मैदानात उतरला होता. एक षटक फेकल्यानंतर बुमराहला त्याची चूक कळली. तेव्हा तो पुन्हा ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि जर्सी बदलून आला. बुमराहने भारतीय संघाची नेहमीची कसोटी क्रिकेटची जर्सी घातली, ज्यात स्पॉन्सरचे नाव होते. पण अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाला वेगळी जर्सी देण्यात आली आहे.