मुंबई - भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने कोरोनावर मात केली आहे. यामुळे तो आता इंग्लंड दौर्यावर जाऊ शकणार आहे.
उपचार केल्यानंतर वृद्धीमान साहाची दोन वेळा कोरोना चाचणी करण्यात आली. यात दोन्ही वेळा त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. यामुळे त्याचा इंग्लंड दौऱ्यावर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इंग्लंड दौर्यासाठी साहाची २० सदस्यीय संघात निवड आहे. मात्र त्याची अंतिम निवड तंदुरुस्तीवर आधारित होती. ४ मे रोजी हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यापूर्वी साहा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. आयपीएल २०२१चा हंगाम त्याच दिवशी पुढे ढकलण्यात आला.
भारतीय संघाचे खेळाडू लवकरच मुंबईत एकत्र जमणार आहेत. त्यांच्यासोबत साहा देखील जोडला जाणार आहे. २ जून रोजी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यात प्रथम जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध ५ सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे.
लंडन सरकारकडून भारतीय संघाला दिलासा
भारतात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. यामुळे लंडन सरकारने भारताला लाल यादीत टाकले आहे. त्यामुळे नियमानुसार भारतातून येणाऱ्या लंडन किंवा आयर्लंड नागरिकांनाच लंडनमध्ये प्रवेश देण्यात येईल. पण लंडन सरकारने भारतीय संघासाठी क्वारंटाइन नियमांत आणि प्रवास बंदीचे काही नियम शिथिल केले आहेत.