मुंबई :महिला प्रीमियर लीगचा थरार कायम आहे. भारतात पहिल्यांदाच होत असलेल्या या लीगमध्ये पाच संघ सहभागी झाले आहेत. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स टीम धमाकेदार खेळी खेळत आहेत. रॉयलची कर्णधार स्मृती मानधना, मुंबई इंडियन्सची हरमनप्रीत कौर, दिल्ली कॅपिटल्सची मेग लॅनिंग, यूपी वॉरियर्सची एलिसा हिली आणि गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मुनी आहेत. मेग, अॅलिसा आणि बेथ या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू आहेत. या तिघांनी नुकत्याच दक्षिण आफ्रिकेत झालेल्या महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन बनवले आहे.
हे खेळाडू जगभरातील मुलींसाठी आदर्श :स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, मेग लॅनिंग, अॅलिसा हिली आणि बेथ मुनी यांनी क्रिकेट जगतात स्वत:चा ठसा उमटवला आहे. याशिवाय जेमिमा रॉड्रिग्स, ॲशले गार्डनर, स्नेह राणा, दीप्ती शर्मा या दिग्गज खेळाडूंनी क्रिकेट विश्वात आपली छाप सोडली आहे. डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सत्रात सहभागी होणारे हे खेळाडू जगभरातील मुलींसाठी आदर्श आहेत. मेग लॅनिंग, स्मृती मानधना यांच्यासह दिग्गज महिला क्रिकेटपटूंनी सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.