मुंबई -जगातील तिसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम तयार करण्याची तयारी भारतामध्ये सुरू झाली आहे. हे स्टेडियम राजस्थानची राजधानी जयपुरमध्ये उभारले जाणार आहे. दरम्यान, मागील काही महिन्यापासून या स्टेडियमची चर्चा सुरू होती. राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख वैभव गहलोत यांनी या वर्षाच्या सुरुवातीला जयपुरमध्ये स्टेडियम उभारण्याची घोषणा केली होती. त्याआधी ललित मोदी यांनी स्टेडियम उभारण्याबाबत सांगितलं होतं. आता या स्टेडियममध्ये काय खास आहे हे जाणून घेऊयात...
जयपूर क्रिकेट स्टेडियम शहराच्या बाहेर उभारण्यात येणार आहे. या स्टेडियमची उभारणी दोन फेजमध्ये करण्यात येणार आहे. पहिल्या फेजमध्ये ४५ हजार प्रेक्षक क्षमतेचे स्टेडियम उभारले जाईल. त्यानंतर त्याची क्षमता ३० हजारने वाढवण्यात येणार आहे. एकूण या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ७५ हजार इतकी असणार आहे. जगातील सर्वात मोठे स्टेडियम हे नरेंद्र मोदी स्टेडियम आहे. त्याची प्रेक्षक क्षमता १.१० लाख इतकी आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलिया मेलबर्नचे ग्राउंड असून याची प्रेक्षक क्षमता एक लाख इतकी आहे.
जयपूर येथील नविन स्टेडियम १०० एकर जागेवर उभारले जाणार आहे. यासाठी अंदाजे ६५० कोटी रुपयांचा खर्चाचा अंदाज आहे. पहिल्या फेजमध्ये ३०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. यातील १०० कोटी बीसीसीआय देणार आहे. तर १०० कोटीचे कर्ज घेतले जाणार आहे. राहिलेल्या रकमेची व्यवस्था आरसीए करणार आहे. याशिवाय कॉर्पोरेट बॉक्स विकून देखील पैसा उभारला जाणार आहे. स्टेडियम उभारणीसाठी ५ वर्षांचा कालवधी लागले. हे स्टेडियम जयपूर दिल्ली महामार्गाजवळ उभारण्यात येत आहे.