लंडन :भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान आज दुपारी 3 वाजता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना इंग्लंडच्या द ओवलमध्ये होणार आहे. दोन्ही संघांनी या अंतिम सामन्यासाठी खडत्तर सराव केला आहे. कसोटी सामन्यात आपणच अव्वलस्थानी विराजमान होण्यासाठी प्रबळ दावेदार असल्याचा दावा दोन्ही संघाकडून करण्यात आला आहे.
कोण बनेल कसोटीचा चॅम्पियन : कसोटी सामान्यात कोण अव्वल असेल यावरुन अनेकजण आपले मत मांडत आहेत. अनेक दिग्गज खेळाडू आपल्या मतांमुळे दोन गटात विभागले गेले आहेत. काहींना भारतीय संघ अव्वलस्थानी राहणार असे वाटत आहे तर काहींना ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी सामन्याचा चॅम्पियन बनेल असे वाटत आहे. दरम्यान भारतीय संघातील बहुतेक खेळाडू हे आयपीएल खेळून आले आहेत. त्यामुळे त्यांना कसोटी सामन्यात खेळणे एक आव्हान असेल. तर काही क्रिकेट एक्सपर्टच्या मते, ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडू हे क्रिकेट खेळण्यासाठी दीर्घकाळानंतर मैदानावर उतरणार आहेत. त्यामुळे ते त्यांच्यासाठी नुकसानकारक असेल. दरम्यान आज आपल्याला या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. कोणता संघ दमदार खेळ करत कसोटी सामन्यात चॅम्पियन बनतो ते कळणार आहे. दोन्ही संघाची ताकद सारखी दिसत आहे. यामुळे हा सामना चुरशीचा असणार आहे.
जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणार्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हिरव्यागार खेळपट्टीवर खेळवला जाणार आहे. नुकतेच खेळपट्टीचे काही फोटो समोर आले होते. त्यात खेळपट्टीच्या काही भागात खेळपट्टीवर हिरवे गवत आहे. यामुळे या खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळू शकते. खेळपट्टीवर अधिक उसळी असेल. या खेळपट्टीतून फिरकीपटूंनाही मदत मिळणे अपेक्षित आहे. त्याचवेळी, या मैदानावर जोही कर्णधार नाणेफेक जिंकेल तो प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेईल अशी शक्यता आहे.
WTC फायनलसाठी भारताचे संभाव्य प्लेइंग-11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत/इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर/रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव. WTC फायनलसाठी ऑस्ट्रेलियाचे संभाव्य प्लेइंग-11 : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (क), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
हेही वाचा -
- MPL 2023 : IPL प्रमाणे आता राज्यात MPL चे आयोजन, 'हे' आहेत संघ
- WTC Final 2023 : दोन्ही संघ संतुलित, सामना रोमांचक होणार - दिलीप वेंगसरकर