मुंबई - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काइल जेमिसनने भारतीय संघाला अडचणीत ढकलले आहे. त्याच्या धारधार गोलंदाजीमुळे भारताचा पहिला डाव २१७ धावा आटोपला. न्यूझीलंडचा या गोलंदाजाविषयी भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने मोठा खुलासा केला आहे. आयपीएलमध्ये सरावादरम्यान विराट कोहलीला गोलंदाजी करण्यास जेमिसनने नकार दिला होता, असे आकाशने सांगितलं आहे.
काइल जेमिसनने भारताविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील तिसऱ्या दिवशी धारदार गोलंदाजी केली. त्याने ३१ धावांत भारताच्या ५ गड्यांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय संघाला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. जेमिसनने कर्णधार विराट कोहलीला इनस्विंगवर पायचित करत भारतीय डावाला मोठा धक्का दिला.
अंतिम सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळाचे विश्लेषण आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून केलं. यात तो म्हणाला, 'जेमिसनने प्लॅनिगं करत विराटची विकेट घेतली. पहिल्या दिवशी तो विराटला ऑफ स्टम्प बाहेर गोलंदाजी करत होता. विराट हे चेंडू सोडून देत होता. परंतु, तिसऱ्या दिवशी जेव्हा विल्यमसनने जेमिसनला गोलंदाजीसाठी पाचारण केले. तेव्हा त्याने विराटला इनस्विंगचा मारा करत बाद केलं. विराट ४४ धावांवर बाद झाला. याचे खरे कारण जेमिसनने आयपीएलमध्ये विराटविरुद्ध गोलंदाजी करण्यास नकार देणं आहे.'