नवी दिल्ली World Cup 2023 :आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आलीय. मंगळवारी (5 सप्टेंबर) दुपारी १:३० वाजता मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन संघाची माहिती दिली.
केएल राहुलचा संघात समावेश : बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अकादमीनं मंजुरी दिलेल्या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आलाय. यामध्ये विकेटकीपर फलंदाज केएल राहुल, फलंदाज सूर्यकुमार यादव, अष्टपैलू हार्दिक पांड्या, सलामीवीर शुभमन गिल, भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांचा समावेश आहे. भारताच्या वेगवान फळीचं नेतृत्व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह करेल. त्याला मोहम्मद शमी, मोहम्मद सिराजसह आणि शार्दुल ठाकूर साथ देतील. अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीनं चायनामन कुलदीप यादव, डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांच्यावरही विश्वास दाखवला आहे.
आमचा सर्वोत्तम १५ जणांचा संघ : यावेळी बोलताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, 'हा आमचा सर्वोत्तम १५ जणांचा संघ आहे. उपांत्यपूर्व फेरीपूर्वी आमच्याकडे स्पर्धेतील नऊ सामने आहेत. त्यामुळे आम्ही थोडं निर्धास्त आहोत. एक किंवा दोन सामन्यात खराब प्रदर्शन केल्यानंतरही आम्ही स्पर्धेत परतू शकतो', असं रोहित म्हणाला. 'आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. याची आमच्याकडे बऱ्याच काळापासून कमतरता होती', असं त्यानं स्पष्ट केलं.