कराची - आगामी आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला 17 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धीं मधील लढत 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याआधीच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली याने भारताला पराभूत करण्याची भाषा केली आहे.
एका यूट्युब चॅनलला बोलताना हसन अली म्हणाला की, 2017 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये आम्ही भारताला पराभूत केले होते. तो काळ आमच्यासाठी चांगला होता. आता आम्ही तशीच कामगिरी करून आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारताला पराभूत करण्याचा प्रयत्न करू. भारताविरुद्धच्या सामन्यात दोन्ही देशांच्या चाहत्यांच्या प्रचंड अपेक्षा असतात आणि त्यामुळे दडपणही असते. आम्ही भारताला पराभूत करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करू.
यूएईतील खेळपट्टी स्पिनरसाठी मदत करणारी आहे. या खेळपट्टीवर कशी गोलंदाजी करावी याचा आम्हाला अभ्यास आहे. खेळपट्टी पाहून सर्व संघ आपल्या संघात फिरकीपटूंना अधिक स्थान देत आहेत, असे देखील हसन अलीने सांगितलं.
मिसबाह उल हक आणि वकार युनूस यांनी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेआधी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला. यामुळे निराश झाल्याची कबुली देखील हसन अलीने दिली. तो म्हणाला, प्रामाणिकपणे सांगतो, मी यामुळे निराश होतो. कारण टी-20 विश्वकरंडक स्पर्धा समोर आहे अशात त्यांनी पद सोडलं. पण खेळाडूंच्या हातात काय नसते. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड याविषयावर लक्ष देईल. आमचे काम आहे की, फक्त खेळावं आणि जास्ती जास्त सामने जिंकावी.