मुंबई -वेस्ट इंडिजने पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत पाच सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिज संघाने पहिला टी-२० सामना १८ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १४५ धावा उभारल्या. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ हा सामना सहज जिंकणार असे वाटत होते. परंतु, वेस्ट इंडिजच्या ओबेड मेकॉय आणि हेडन वॉल्श या दोन गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या मनसुब्यावर पाणी फेरले. दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले नाही तर विंडिज संघाला विजय देखील मिळवून दिला.
१९ धावांत ऑस्ट्रेलियाचे ६ फलंदाज बाद -
वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेल्या १४६ धावांच्या आव्हानाच्या पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरूवात खराब झाली. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सावध फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाने ४ बाद १०५ धावा धावफलकावर लावल्या. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ४८ चेंडूत ३० धावांची गरज होती. त्यात सेट फलंदाज मैदानात होते. यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ हा सामना सहज जिंकेल, असा कयास लावला जात होता. परंतु , सामन्यात ट्विस्ट बाकी होते. ऑस्ट्रेलियाचे सहा गडी १९ धावांत बाद झाले आणि विंडिजने हा सामना जिंकला.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना ओबेड मेकॉय आणि हेडन वॉल्श यांच्या घातक गोलंदाजीचा सामना करता आला नाही. मेकॉयने अॅश्टन अगर (१), मिचेश स्टार्क (३) आणि जोश हेझलवूड (०) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर वॉल्शने मॅकडेमोर्ट (२), मिचेल मार्श (५१) आणि डेनिल ख्रिश्चियन (१०) यांची शिकार केली. दरम्यान, या सामन्यात मेकॉयने २६ धावांत ४ गडी बाद केले. तर वॉल्शने २३ धावांत ३ फलंदाजांना तंबूत धाडलं.