अँटिग्वा -वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत विजयी लय कायम राखली आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने पाहुण्या संघाचा ५६ धावांनी पराभव केला. या विजयासह वेस्ट इंडिज संघाने ५ सामन्याच्या मालिकेत २-० ने मोठी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १९६ धावांचे आव्हान उभारले होते. ऑस्ट्रेलियाचा संघ १९.२ षटकात १४० धावांवर ढेपाळला.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा वेस्ट इंडिज संघाची सुरूवात खराब झाली. पण शिमरोन हेटमायर याने अर्धशतक झळकावत वेस्ट इंडिजचा डाव सावरला. त्याने चौथ्या नंबरवर फलंदाजीला येत ३६ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. यात २ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. तो धावबाद झाला. हेटमायर याने चौथ्या गड्यासाठी ड्वेन ब्रोव्होसोबत १०३ धावांची भागिदारी केली. या भागिदारीमुळे वेस्ट इंडिज संघाला मोठी धावसंख्या उभारता आली. ब्राव्होने ३४ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ४७ धावांची खेळी साकारली.
आंद्रे रसेलची वादळी खेळी
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने वादळी खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. त्याने ८ चेंडूत नाबाद २४ धावा चोपल्या. यात २ चौकार आणि २ उत्तुंग षटकाराचा समावेश आहे. ब्राव्हो आणि रसेल जोडीने पाचव्या गड्यासाठी नाबाद ३४ धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूड, अॅश्टन अगर, मिचेल मार्श यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.