फ्लोरिडा : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या 5 सामन्याची टी20 मालिकेत वेस्ट इंडिजने मालिका आपल्या नावे केली आहे. फ्लोरिडातील प्रोविडेंसच्या मैदानात भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये पाचवा आणि शेवटचा सामना झाला. टी20च्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. वेस्ट इंडीजने 8 गडी राखून सामना जिंकला आणि मालिका आपल्या खिशात घातली. दरम्यान सामना झाल्यानंतर मुलाखतीत बोलताना हार्दिक म्हणाला की, कधी-कधी पराभव चांगला असतो. त्याच्या या प्रतिक्रियेवर अनेकांनी डोळे विस्फारले आहेत.
सुमार कामगिरी : नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय संघाच्या पथ्यावर पडला नाही, कारण भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. मागील सामन्यासारखी कामगिरी करण्यात सलामीवीर जोडी अपयशी ठरली. शुबमन गिलने फक्त 9 धावा केल्या. तर यशस्वी जयस्वालही या सामन्यात सपशेल अपयशी ठरला. एकटा सूर्यकुमारने जोरदार खेळी केली. सुर्याने 61 धावा या सामन्यात काढल्या. तर त्याला साथ देणारा तिलक वर्माने 27 धावा केल्या. बाकी इतर भारतीय खेळाडूंनी 20 धावांचा आकडादेखील पार केला नाही. इतकेच नाही तर कर्णधार हार्दिक पांड्याला फक्त 13 धावा करता आल्या. भारताने 9 विकेट गमावत मात्र 165 धावा केल्या. भारताकडून देण्यात आलेले आव्हान वेस्ट इंडीजने 2 विकेट राखून पूर्ण केले.
पराभव ही चांगला पण कसा : नेहमी विजयासाठी आग्रही असणाऱ्या हार्दिकला या मालिकेत 3-2 ने पराभव स्वीकारावा लागला. मात्र सादरीकरणात त्याने कधी-कधी पराभव चांगला असतो, असे म्हटले. यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या. सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, आम्हाला चांगल्या प्रकारे सामना संपवता आला नाही. पण यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. पराभव कधी-कधी चांगला असतो. कारण तो आपल्याला काही गोष्टी शिकवत असतो. जय-पराजय हा खेळाचा भाग आहे, असे मी मानतो. सामन्याविषयी बोलताना हार्दिक म्हणाला की, त्याने सामन्यासाठी कोणतीही रणनीती आखली नव्हती. आम्ही एक संघ म्हणून जे कठीण आहे ते करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे प्रथम फलंदाजी केल्याबद्दल मला पश्चाताप होत नाही. तसेच अशा खेळांमुळे आम्हाला चांगले शिकायला मिळेल.
टीम इंडियावर 6 वर्षांनी विजय : रोव्हमन पॉवेलच्या नेतृत्त्वाखाली वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने टीम इंडियाला 3-2 असे पराभूत केले. टी 20 सामन्याच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात विजय मिळवत वेस्ट इंडिजने मालिका आपल्या नावावर केली. भारताविरुद्ध खेळताना संपूर्ण मालिका आपल्या नावावर करण्यासाठी वेस्ट इंडिजला 6 वर्षाची वाट पाहावी लागली. याआधी 2017 मध्ये वेस्ट इंडिजने टी20 मालिकेत भारताचा पराभव केला होता.
हेही वाचा-
- Virat Kohli On Babar Azam : बाबर आझमबाबत विराट कोहलीचे मोठे वक्तव्य, म्हणाला..
- IND Vs WI, Match: वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी20 मध्ये सूर्या तळपला, टीम इंडिया विजयी, हार्दिक पांड्या मात्र 'ट्रोल'