अँटिगा -वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्टॅफनी टेलर हिने पाकिस्तान विरुद्धच्या टी-२० सामन्यात हॅट्ट्रीक घेत इतिहास रचला. गोलंदाजीशिवाय तिने फलंदाजीतदेखील योगदान देत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह वेस्ट इंडिजने पाकिस्तान महिला क्रिकेट संघाला टी-२० मालिकेत ३-० ने क्लिन स्वीप केलं.
वेस्ट इंडिज महिला क्रिकेट आणि पाकिस्तान महिला क्रिकेट यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात पाकची कर्णधार जावेरिया खान हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण तिचा हा निर्णय पाकिस्तानच्या अंगाशी आला. पाकिस्तानचा संघ १९.४ षटकात १०२ धावांवर ऑलआउट झाला. यात आलिया रियाज हिने सर्वाधिक २९ धावांचे योगदान दिले.
स्टॅफनी टेलरने २० षटकात आलिया रियाज, डायना बेग आणि अनम अमीन यांना बाद करत हॅट्ट्रिक साधली. या सामन्यात टेलरने ३.४ षटकात १७ धावा देत ४ गडी बाद केले. टेलर टी-२० क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक विकेट घेणारी वेस्ट इंडिजची दुसरी खेळाडू ठरली.