ब्रिजटाउन (बार्बाडोस):वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड ( West Indies v England ) संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील बार्बाडोसमध्ये झालेला दुसरा कसोटी सामनाही अनिर्णित ( Second Test also Draw ) राहिला. या अगोदर खेळला गेलेला पहिला कसोटी सामना देखील अनिर्णित राहिला होता. त्यामुळे मालिकेचा निर्णय आता ग्रेनाडा येथे होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यावर अवलंबून असणार आहे. इंग्लंडने रविवारी पाचव्या आणि शेवटच्या दिवशी उपाहारापर्यंत खेळ सुरू ठेवला. त्यानंतर त्यांचा दुसरा डाव 6 बाद 185 धावांवर घोषित करून वेस्ट इंडिजसमोर 282 धावांचे लक्ष्य ठेवले.
वेस्टइंडीज संघाला 65 षटकांत 282 धावांचे लक्ष्य पूर्ण करायचे होते. त्यामुळे या संघाला चार रन प्रति ओवर करायच्या होत्या. परंतु हा संघ दोन रन प्रति ओवर करु शकला. त्यांचा संघ 5 बाद 135 धावाच करु शकला. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला.
वेस्ट इंडिजकडून दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा क्रेग ब्रॅथवेटने ( Kraigg Brathwaite ) केल्या. त्याने 184 चेंडूचा सामना करताना 4 चौकाराच्या मदतीने 56 धावांची खेळी करुन नाबाद राहिला. परंतु इतर फलंदाजांनी साफ निराशा केली. त्यामुळे त्यांना हा सामना अनिर्णित राखावा लागला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना सर्वाधिक विकेट्स जॅक लिचने ( Jack Litch ) घेतल्या. त्याने 25 षटकांत 36 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर साकिब महमूदने ( Sakib Mahmood ) देखील 2 विकेट्स घेतल्या.
दोन्ही संघाचे दोन डाव -
इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिला डाव 9 बाद 507 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात 411 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर दुसरा डाव इंग्लंडने 6 बाद 185 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर वेस्ट इंडिज संघाला दुसऱ्या डावात 65 षटकांत 282 धावांचे लक्ष्य पूर्ण करायचे होते. परंतु हा संघ 5 बाद 135 धावाच करु शकला.