अहमदाबाद : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India v West Indies) संघात वनडे आणि टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडीजचा संघ आज सकाळी भारतात दाखल झाला आहे. या दोन्ही संघात 6 फेब्रुवारीपासून अहमदाबाद येथे तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. तसेच या मालिकेतील सर्व सामने नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium Ahmedabad) खेळले जाणार आहेत.
क्रिकेट वेस्ट इंडिजने आपल्या (Cricket West Indies information) अधिकृत ट्विटर अकाउंटवर बुधवारी सकाळी पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजने आपल्या ट्विटमध्ये लिहले की, "बार्बडोसहून दोन दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर, मेन इन मॅरून भारतात आले आहेत!"
तत्पुर्वी गुजरात क्रिकेट असोसिएशन (Gujarat Cricket Association), जे तीन एकदिवसीय सामन्यांचे आयोजन करणार आहे, त्यांनी आधीच सांगितले आहे की सध्याच्या कोविड-19 परिस्थितीमुळे सामने बंद दाराआड खेळवले जातील. परंतु कोलकाता येथे खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी पश्चिम बंगाल सरकारने 75 टक्के प्रेक्षकांना मैदानावर उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.
कोलकाता येथे टी-20 मालिकेला 16 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. टी-20 मालिकेतील दुसरा आणि तिसरा टी-20 सामना 18 आणि 20 फेब्रुवारीला होणार आहे. हे सर्व सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडिअमवर (Eden Gardens Stadium in Kolkata) खेळले जाणार आहेत.