दुबई - आयसीसी टी-20 विश्वकरंडक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर यादरम्यान यूएई आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे. क्रिकेटच्या या महाकुंभाची उत्सुकता संपूर्ण जगामध्ये पाहायला मिळत आहे. दुसरीकडे सर्व संघ या स्पर्धेसाठी जय्यत तयारी करत आहे. यादरम्यान, कोणता संघ वरचढ ठरणार याची चर्चा रंगली आहे. यात वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने देखील त्यांचं मत मांडलं आहे.
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने सांगितलं की, गतविजेता वेस्ट इंडिजचा संघ टी-20 विश्वकरंडकासाठी तयार आहे. सॅमी आयसीसी डिजिटल शोमध्ये बोलत होता. तो म्हणाला की, मला जास्त डोकं लावण्याची गरज नाहीये, वेस्ट इंडिजचा संघ टी-20 विश्वकरंडकासाठी तयार आहे. जेव्हा तुम्ही वेस्ट इंडिजकडे पाहता आणि अनेक लोक म्हणतात की, मी एकतर्फा बोलत आहे. परंतु, अखेरच्या चार स्पर्धा पाहिल्यास आम्ही उपांत्य फेरीत पोहोचलो आणि यातील दोन वेळा आम्ही स्पर्धा जिंकली.
आमच्याकडे चांगले खेळाडू आहेत. कर्णधार केरॉन पोलार्ड चांगले पाठबळ देत आहे. याशिवाय ख्रिस गेल, आंद्रे रसेल, जेसन होल्डर, फॅबियन एलेन आणि एविन लुईस आहे. माझ्याकडे असे अनेक खेळाडूंची यादी आहे जे कोणत्याही संघावर भारी पडू शकतात, असे देखील डॅरेन सॅमीने सांगितलं.