लंडन - सध्या इंग्लंडमध्ये विटालिटी ब्लास्ट टी-२० क्रिकेट स्पर्धेची धूम पाहायला मिळत आहे. न्यूझीलंडच्या २ तर इंग्लंडच्या एका गोलंदाजाने या स्पर्धेत एकाच दिवशी हॅट्ट्रिक घेतली आहे. विशेष म्हणजे ह्यामध्ये न्यूझीलंडच्या दोन्ही गोलंदाजांनी सामन्याच्या शेवटच्या तीन चेंडूवरवर ही हॅट्ट्रिक घेतली आहे. न्यूझीलंडच्या एडम मिल्नेने केंटकडून तर लॉकी फर्ग्युसनने यॉर्कशरकडून खेळताना ही हॅट्ट्रिक घेतली. तर इंग्लंडचा गोलंदाज ब्लेक कलन यानेदेखील हॅट्ट्रिक विकेट आपल्या नावे केली आहे.
यॉर्कशर विरुद्ध लँकशर सामन्यामध्ये फर्ग्युसनने हॅट्ट्रिक घेतली. फर्ग्युसनने सुरुवातीला कर्णधार डेन विलासला बाद केले होते. यानंतर रॉब जोन्सने ४८ चेंडूत नाबाद ६१ धावा काढत संघाला जिंकवण्यासाठी जोरदार संघर्ष केला. परंतु त्याचा हा प्रयत्न अपयशी ठरला. फर्ग्युसनने इनिंगच्या शेवटच्या तीन चेंडूवर ल्यूक वेल्स, ल्यूक वूड आणि टॉम हर्टली यांना बाद करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. तसेच यॉर्कशरला विजयदेखील मिळवून दिला.
केंट विरुद्ध सरे यांच्यातील सामन्यामध्ये देखील असाच प्रकार घडला. केंटने सरेला विजयासाठी १९१ धावांचे आव्हान दिले होते. सरेची सुरुवात खराब झाली पण त्यानंतर विल जॅक्सने ५४ चेंडूमध्ये ८७ धावा करत संघाला विजयाच्या समिप आणले. त्यावेळी अॅडम मिल्ने याने शेवटच्या तीन चेंडूवर सामन्याचे चित्र पालटवले. एडम मिल्ने याने न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू काइल जेमिसनसह तिघांना बाद करून संघाला विजय मिळवून दिला.