मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून खुद्द विराट कोहलीने याची माहिती दिली. विराट कोहलीने आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल भावूक होऊन सविस्तर पोस्ट लिहिली आहे.
विराट कोहलीने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक सविस्तर पत्र पोस्ट केले आहे. यात विराटने सुरूवातीलाच सर्वांचे आभार मानले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून केलेल्या या वाटचालीत मला साथ देणाऱ्या सर्वांचे आभार, असे त्याने म्हटलं आहे.
विराट कोहलीने त्याच्या पत्रात काय म्हटलं आहे
विराट कोहलीने त्याच्या पत्रात म्हटलं आहे की, मला फक्त भारतीय संघात खेळण्याचीच नाही तर भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी मिळाली. यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून मला पाठिंबा आणि मदत करणाऱ्या सगळ्यांचे मी आभार मानतो. संघातील सहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे प्रशिक्षक आणि आमच्या विजयासाठी प्रार्थना करणारा प्रत्येक भारतीय यांच्याशिवाय मी हे करू शकलो नसतो.
स्वत:वर असणारा ताण समजून घेणे गरजेचे आहे. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून मी तिन्ही प्रकारात भारतीय संघाने कर्णधारपद सांभाळत आहे. पण आता वाटू लागले आहे की, स्वत:ला वेळ द्यायला हवा. जेणेकरून एकदिवसीय आणि कसोटी अशा दोन्ही प्रकारांमध्ये मी भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी पूर्णपणे तयार राहीन. टी-20 संघाचा कर्णधार म्हणून मी शक्य ते सगळे दिले आहे. एक फलंदाज म्हणून यापुढेही मी ते करत राहणार आहे, असे देखील विराट कोहलीने आपल्या पत्रात म्हटलं आहे.