नवी दिल्ली Virat Kohli : विश्वचषकाच्या फायलमधील पराभव सर्व भारतीयांच्या जिव्हारी लागला आहे. स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करूनही भारतीय संघानं ऐन वेळी कच खाल्ली आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं शानदार विजय मिळवला. या पराभवासह भारताचा तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला. यानंतर आता टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं एक मोठा निर्णय घेतला आहे.
विराट कोहलीनं घेतला ब्रेक : विराट कोहलीनं मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनुसार, विराट कोहलीनं बीसीसीआयला सांगितलं की, "तो दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी उपलब्ध असणार नाही. त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटपासून काही काळ विश्रांतीची गरज आहे. मात्र तो कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असेल".
विश्वचषकात शानदार कामगिरी केली :विराट कोहली नुकत्याच झालेल्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्यानं विश्वचषकाच्या ११ डावांमध्ये ७६५ धावा केल्या. यामध्ये तीन शानदार शतकांचाही समावेश होता. या कामगिरीनंतर विराट कोणत्याही एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडला. मात्र आता विश्वचषकानंतर विराट मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळण्याच्या मूडमध्ये नसल्याचं बोललं जातय. मात्र तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असेल.
टीम इंडियाचा द. आफ्रिका दौरा : भारतीय संघ १० डिसेंबरपासून द. आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या भूमीत ३ टी २० सामने आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यानंतर २ कसोटी सामन्यांनी दौऱ्याची सांगता होईल. २०२३ च्या विश्वचषकापूर्वी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर दोघेही तिसऱ्या सामन्यासाठी संघात परतले होते. सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियासोबत ५ टी २० सामन्यांची मालिका खेळत आहे. यामध्ये विश्वचषकात खेळणाऱ्या जवळपास सर्वच खेळाडूंना ब्रेक देण्यात आलाय.
हेही वाचा :
- राहुल द्रविडच राहणार टीम इंडियाचा हेड कोच, व्हीव्हीएस लक्ष्मणकडे 'ही' जबाबदारी
- सुनील गावसकर पोहोचले 'सचीन' रेल्वे स्थानकावर! फोटो व्हायरल; जाणून घ्या कुठे आहे हे स्टेशन