नवी दिल्ली :दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात रविवारी भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी झाला. न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. पाकिस्तावरील भारताच्या या शानदार विजयानंतर भारतीय महिला संघाचे सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक होत आहे. या विजयानंतर भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी महिला संघाचे कौतुक केले आहे.
कोहली आणि सचिनचे ट्विट : विराट कोहलीने ट्विट करून लिहिले की, 'दबावाच्या आणि खडतर सामन्यात धावांचा पाठलाग करताना आमच्या महिला संघाचा पाकिस्तानविरुद्धचा विजय विलक्षण आहे. महिला संघ प्रत्येक स्पर्धेत मोठी झेप घेतो आहे, जे देशवासियांसाठी प्रेरणादायी आहे. मुलींच्या संपूर्ण पिढीने हा खेळ स्वीकारला पाहिजे आणि महिला क्रिकेटला अधिक उंचीवर नेले पाहिजे. देव तुम्हा सर्वांना अधिक शक्ती देवो'. सचिन तेंडुलकरने लिहिले, 'अंजली आणि अर्जुनसोबत सामना पाहिला आणि भारतीय महिला संघासाठी चीअरिंगचा आनंद लुटला. शेफालीने चांगली सुरुवात केली, जेमिमाने बहारदार खेळी केली आणि ऋचाने शानदारपणे विजय खेचून आणला. भारताला पुन्हा एकदा जिंकताना पाहून आनंद झाला'.
लक्ष्मणचे आणि कुंबळेनी दिल्या शुभेच्छा :सामन्यानंतर ट्विट करताना दिग्गज क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला, 'काय हा विजय! महिला T20 विश्वचषकाच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग. जेमिमा रॉड्रिग्ज आणि ऋचा घोष यांनी धावांचा पाठलाग करताना शानदार फलंदाजी केली. त्यांची ही खेळी खास आहे. स्पर्धेची उत्कृष्ट सुरुवात, शुभेच्छा. भारतीय महिला संघाच्या विजयाने अनिल कुंबळेही उत्साहात आहे. त्याने ट्विट करून लिहिले, 'टी 20 महिला विश्वचषक मोहिमेची शानदार विजयासह सुरुवात केल्याबद्दल जेमिमा रॉड्रिग्ज आणि टीमचे अभिनंदन'.
भारताचा 7 गड्यांनी विजय : नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधार बिस्माहने 55 चेंडूत सात चौकारांसह 68 धावा केल्या. तर आयशा नसीम हिने 25 चेंडूत झटपट 43 धावांची खेळी केली. दोघींनी 47 चेंडूत नाबाद 81 धावांची भागिदारी केली. या भागिदारीच्या बळावर पाकिस्तानने 20 षटकांत 149 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून राधा यादव हिने दोन विकेट घेतल्या तर दिप्ती शर्मा, पूजा वस्त्रकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. पाकिस्तानने दिलेल्या धांवाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून युस्तिका भाटिया आणि शेफाली वर्मा यांनी डावाला सुरुवात केली. शेफालीने 25 चेंडूत 33 धावा केल्या तर युस्तिकाने 2 चौकारांच्या मदतीने 17 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने 12 चेंडूत 16 धावा केल्या. जेमिमाने शानदार कामगिरी करत नाबाद अर्धशतक झळकावले. तिने 38 चेंडूंचा सामना करत 53 धावा केल्या. रिचा घोषाने 20 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. भारताने 150 धावांचे लक्ष 3 गडी गमावून गाठले.
हेही वाचा :WPL 2023 Auction : महिला प्रीमियर लीग लिलाव ; स्मृती, हरमनप्रीत आणि शेफालीसाठी एक कोटीहून अधिक बोली अपेक्षित